एकता दर्शन (फलटण) : फलटण शहर ऐतिहासिक आहे. हे शहर छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्रीरामाच्या इतिहासाशी जोडलेले असल्याने या शहरामध्ये मोठे परिवर्तन झाले पाहिजे असल्याची अपेक्षा व्यक्त करत टीका टिप्पणी कडे लक्ष देऊ नका, डॉ.संपदा मुंडे यांनी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आपलं जीवन संपवलं आहे. त्याचे भांडवल करून कोणाला तरी टार्गेट करायचे हे राजकारणात शोभनीय नाही. त्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तशी माहिती दिली असल्याचे सांगत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा डॉ.संपदा मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
फलटण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर व नगरसेवक पदासाठी उभा असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आयोजित सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन कांबळे पाटील, माजी आमदार राम सातपुते, शिवरूपराजे खर्डेकर, धैर्यशील कदम, दिलीपसिंह भोसले, अॅॅड.जिजामाला नाईक निंबाळकर, सौ.मनीषा नाईक निंबाळकर, सौ.प्रतिभा चेतन शिंदे, जयकुमार शिंदे, बाळासाहेब सोळसकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे पाटील, माणिकराव सोनवलकर, विलास नलवडे, डि.के.पवार, उद्योजक राम निंबाळकर यांच्यासह आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
शहराच्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आपला नगराध्यक्ष नसेल तर शहराच्या परिवर्तनाकरता मोदींनी आणि आम्ही दिलेला लाखो कोटी रुपयांचा निधी हा तुमच्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही. शहराचे कधीच परिवर्तन होणार नाही. आम्ही दिलेला पैसा योग्य प्रकारे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचा असेल तर नगराध्यक्षासहित संपूर्ण नगरपालिका ही भाजपा राष्ट्रवादी युतीच्या हातामध्ये देणे क्रमप्राप्त असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
स्वप्नात नसेल एवढा निधी रणजित दादांच्या प्रयत्नातून फलटणला मिळाला
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फलटणमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आला आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे चालू झाली आहेत. फलटणकडे येणारे जेवढे मार्ग आहेत ते सगळे रणजित दादांनी माझ्या आणि गडकरी साहेबांच्या मागे लागून मंजूर करून घेतले आहेत. फलटण-पंढरपूर पालखी मार्ग, फलटण-बारामती रस्ता, फलटण-पुसेगाव रस्ता, फलटण-दहिवडी रस्ता, फलटण-शिंगणापूर रस्ता, आसू-फलटण-गिरवी रस्ता यासह फलटणमधील अंतर्गत रस्त्यांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर असून प्रत्यक्ष कामे सुरू आहेत. कुणाच्याही स्वप्नात नसेल एवढा निधी फलटण शहराकरता रणजित दादांच्या प्रयत्नातून मिळाला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले.
नाईकबोमवाडी एमआयडीसीत उद्योग आणल्याशिवाय शांत बसणार नाही
क्रीडांगण, तारांगण, अभ्यासिका, नाट्यगृह यासाठी रणजित दादांनी आणि आमदार सचिन पाटील यांनी
वेगवेगळ्या स्तरांवर मंजुरी मिळवली आहे. वारकरी भवन, प्रशासकीय भवन, दोन पोलीस स्टेशन, पोलिसांकरता उत्तम घर, अतिरिक्त सत्र न्यायालय आदी कामे पूर्ण झाली असून दिवाणी न्यायालयाचे कामकाज एकाच ठिकाणी होण्यासाठी येणार्या काळामध्ये न्यायालयाची इमारत उभी करून देणार असल्याचे आश्वासन देत रणजित दादांच्या प्रयत्नातून तयार केलेल्या एमआयडीसीत लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी सात-आठ मोठ्या उद्योजकांशी माझे बोलणे चालू असून त्या ठिकाणी मी उद्योग आणल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
ते नालायक आहेत म्हणून मत मागत नाही ; माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे
नगरपालिकेच्या निवडणुकीचा हा दुसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात विविध शहरांमध्ये माझ्या ४२ सभा झाल्या. कुठल्याही शहरात मी नेत्यांवर टीका केली नाही. माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे. विकासाचा कार्यक्रम असताना मला टीका करायची गरज नाही. परिवर्तन घडवण्याकरता मी आलो आहे. सकारात्मक मत मागण्या करता आलो आहे. ते नालायक आहेत म्हणून मत द्या असं मी म्हणत नाही, जे प्रकल्प रणजित दादा व सचिन दादांच्या माध्यमातून आम्ही केले आहेत त्यावर विश्वास असेल तर आम्हाला मत देण्याचे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.
"आमची काळजी तुम्ही घ्या, पुढचे पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ"
येणार्या दोन दिवसात विरोधकांकडून चिखलफेक होईल परंतू चिखलाने कमळाला फरक पडत नाही. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना जनता निवडून देणारच आहे. समशेर दादांनी फलटण मधील माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी भेट घेऊ नये, त्यांना लखपती दीदी करावे. मोदीजींनी लखपती दीदीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये पन्नास लाख लखपती दीदी महाराष्ट्रात तयार झाल्या आहेत. लखपती दीदीमध्ये फलटणच्या बहिणींना आणण्याची जबाबदारी समशेर दादा यांच्यावर असल्याचे सांगत येणार्या २० तारखेला "आमची काळजी तुम्ही घ्या, पुढचे पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ", अशी हमी फडणवीस यांनी उपस्थित जनतेला यावेळी दिली.
दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन कांबळे पाटील, समशेरसिंह नाईक निंबाळकर, अॅड.नरसिंह निकम, संदीप चोरमले, बुरुगले सर, मिलिंद आप्पा नेवसे, बाळासाहेब ननावरे, अनुप शहा, बाळासाहेब सोळसकर, दिलीपसिंह भोसले, शिवरूपराजे खर्डेकर यांची भाषणे झाली.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्यावतीने फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले.
सभेला भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी यांच्यासह फलटण शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.