फलटणकरांचा माऊलींना निरोप
जाऊं देवाचिया गांवां । देव देईन विसांवा ॥ देवा सांगों सुख दुःख । देव निवारील भूक ॥
या संतवाणी प्रमाणे पंढरीच्या विठुरायाला आपली सुख दुःख सांगण्यासाठी माऊलींच्या समवेत निघालेला वैष्णवांचा सागर आध्यात्मिक व ऐतिहासिक अशा फलटण नगरीतील मुक्कामानंतर फलटणचा निरोप घेऊन बरड येथील मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झाला. बरड मध्ये दि.२२ रोजी तालुक्यातील अखेरचा मुक्काम असून ज्ञानेश्वर माऊलींचे बरडकारांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
विस्तीर्ण अशा ऐतिहासिक फलटण नगरीत पहुडलेल्या वैष्णवांच्या सागराला पहाटे जाग आली प्रस्थानाची लगबग सुरू झाली माऊलींना जागे करण्यात आले. उठा पांडुरंगा आता, दर्शन द्या सकळा । झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा ॥ या अभंग उक्तीप्रमाणे वारकरी राजाला पहाटे जाग आली. फलटण नगरीतील विमानतळावरील पालखीतळावर माऊलींची विधिवत पूजा करण्यात आली. माऊलींचा पालखी सोहळा फलटणच्या पालखीतळावरून मार्गस्थ झाला. हा सोहळा शहरातील पालखी मार्गावरून श्रीराम कारखानापर्यंत पोहोचला. दरम्यान शहरवासीयांनी माऊलींचे दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी माऊलींना निरोप दिला.
विडणी येथे सकाळच्या पहिल्या विसाव्यासाठी पालखी सोहळा जात असताना पंढरपूर रस्त्यावरील फलटण हद्दीतील ओढा ओलांडताच रस्त्याच्या दुतर्फा असणारी विविध प्रकारची गर्द झाडे मार्गक्रमण करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आत्मिक समाधान देत होती.

फोटो : रवी लिपारे
सकाळच्या न्याहारीसाठी पालखी सोहळा विडणी येथे थांबला. दरम्यान विडणी पंचक्रोशीतील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. यावेळी विडणी ग्रामपंचायत व अन्य संस्थांच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करून पालखी सोहळ्यातील विश्वस्तांचा सत्कार करण्यात आला. विडणी गावाच्या प्रवेशद्वाराजवळील ओठ्यावर काही वेळ पालखी विसाव्यासाठी ठेवण्यात आली होती. यावेळी माऊलींची आरती करण्यात आली. माऊलींच्या दर्शनासाठी विडणी पंचक्रोशीतील माऊली भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र होते.
न्याहरी आटोपून पालखी सोहळा पिंपरदकडे मार्गस्थ झाला पिंपरदवासियांनी पालखी सोहळ्याचे मनोभावे स्वागत केले. विठ्ठल नामाचा गजर करीत पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी पिंपरद येथे थांबला, यावेळी माऊली सेवेकरांच्या वतीने पादुकांना पंचामृतांनी अभिषेक घालण्यात आला. माऊलींची सेवा करण्याचा हा मान असल्याचे वारकरी संप्रदाय सांगतात.
हे स्वामी राजा बसा भोजनाला, हा पंचपक्वान्न नैवेद्य केला | पुरणाची पोळी तुम्हा आवडीची, लाडू करंजी असे ही खव्याची | डाळिंब द्राक्ष फळे आणि मेवा, केशरी दूध घ्या स्वामी देवा | पुढे हात केला या लेकराने, प्रसाद द्यावा आपुल्या कराने|
अशा प्रकारचे श्लोक म्हणत पिंपरदच्या शिवारात विसावलेल्या सोहळ्यातून भोजनाच्या पंक्ती चालू होत्या. हजारो पंगती उठत होत्या. अन्य भाविकांनी आणलेला प्रसादही वारकरी आवडीने खात होते. भोजनात अवघा वैष्णवजन दंग झाला होता.
पिंपरद येथील दुपारच्या विसाव्यानंतर पालखी सोहळा मजल दरमजल करीत वाजेगाव नाक्यावर आला यावेळी या परिसरातील नागरिकांनी माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. वाजेगाव वरून पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील अखेरच्या मुक्कामासाठी म्हणजे बरडगावी पोहोचला. बरड गावच्या वेशीवर पालखी सोहळ्याचे ग्रामपंचायतच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर पालखी सोहळा बरड गावातील पालखीतळावर विसावला. बरड येथील मुक्कामानंतर पालखी सोहळा दि.२३ रोजी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत मार्गस्थ होणार आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
